पैठण, (प्रतिनिधी): पैठणच्या संत एकनाथ गॅस एजन्सीने कृत्रिम गॅस टंचाई निर्माण केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी तहसील कार्यालयाच्या चक्क पुरवठा विभागातच ठिय्या आंदोलन करण्यात आले.
त्यामुळे महसूलचे कामकाज विस्कळीत झाले होते. दरम्यान पुरवठा अधिकारी कैलास बहुरे यांनी संबंधित गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी केल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले. पैठण शहरातील कृत्रिम गॅस टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शुक्रवारी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या थेट पुखठा विभागात ठिय्या आंदोलन केले.
यावेळी प्रचंड घोषणा देत संत एकनाथ गॅस एजन्सीचा परवाना रद्द करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान पुरवठा अधिकारी कैलास बहुरे यांनी इंडियन डिव्हीजनचे सेल्स ऑफीसर उमेश चौधरी यांना याबाबत कारवाई करण्याबाबतचे पत्र पाठवले असल्याचे सांगितल्यावर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. पैठण शहरात हजारो गृहिणी व व्यवसायिकांना गेल्या ३ महिन्यांपासून कृत्रिम गॅस टंचाईचा सामना करावा लागत आहे.
संत एकनाथ गॅस एजन्सी चालकाचा मनमानी कारभार व संचालकांसह कर्मचाऱ्यांच्या अरेरावीमुळे पैठणकर हैराण झाले आहेत. नागरिकांच्या तक्रारीनंतर तहसीलदार ज्योती पवार व पुरवठा अधिकारी कैलास बहू यांनी सदर गॅस एजन्सीला अनेक वेळा समज दिली. गॅस एजन्सीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारवाई बाबतीत पत्र पाठवले. संपूर्ण गॅस वितरण व्यवस्थेचा आढावा घेतला असता. यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली असल्याचे दिसून आले. बनावट ग्राहक व होम डिलिव्हरी यात फरक आढळून आल्याने आर्थिक घोटाळा असल्याचेही समोर आले. या पार्श्वभूमीवर छावा संघटनेतर्फे सदर गॅस एजन्सीचा आर्थिक गैरव्यवहार व सावळ्या गोंधळाची चौकशी करून परवाना रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
यासाठी शुक्रवारी तहसील कार्यालयाच्या समोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. तथापि सकाळी आंदोलनकत्यांनी थेट पुरवठा अधिकारी कैलास बहुरे यांच्या कार्यालयातच ठाण मांडले. प्रचंड घोषणाबाजी करत गॅस परवाना रद्द करण्याची मागणी केली. गॅस एजन्सी चालकाने आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेण्यात आला. अखेर पुरवठा अधिकारी कैलास बहुरे यांनी पुढाकार घेतला. सेल्स ऑफिसर उमेश चौधरी यांना पाठवलेले पत्र दाखवून आंदोलनकर्त्यांना कारवाईचे संकेत दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.













